प्रिय आउस,

प्रिय आउस,

"काल महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुझ्या हातची खमंग थालीपीठं खायला मिळतील.....अशाच खुशीत आणि किचनमधून येणा-या वासासरशी मांजरीचं नाक लावून आत गेले आणि पाहिलं.....बाबा थालीपीठं करतायत आणि तू बाहेर.....फ़ायलिंग करत बसली होतीस तुझ्या जगावेगळ्या आवडत्या कामांपैकी हे एक.
खरं सांगू का गं, काल तुझ्यापेक्षा बाबांच्याच हातून छान झाली होती थालीपीठं. भाजाणी केप्रचीच, पण थालीपीठं मात्र मला हवी तशी मस्त कुरकुरीत....ती मउ मउ खाणं म्हणजे बोळक्या तोंडाने उगीच उम्म्म्म केल्यासारखं वाटतं, त्याऐवजी ऐटीत आगाउपणा करत,दातांचं ऐक्य मिरवत दह्यात बुडवून खाण्यात कोण आनंद असतो ठाउक आहे?


आणि बाबा म्हणजे अगदी, काठालाही हलक्या दाबाने बोटं फ़िरवून, मध्येच छोटी भोकं पाडून काळजीपूर्वक पॅनवर घालत होते...कारण तुझ्या सराईतपणे फ़िरणा-या हातांची थालीपीठांना सवय त्यामुळे आज अलगद तव्यावर पडून तेलात चुरचुरणा-या त्यांच्याकडे बघून गंमत वाटली. त्यातून ती बाबा करत असताना अजूनच.

नुसती थालीपीठंच नाही तर गरम गरम मुगाची खिचडी, टोमॅटो राईस, फ़ुलके ही बाबांकडे आम्ही हट्टाने केलेली मागणी.....अगदी क्वचितच करतील पण ते अगदी मन लावून,कटकट न करता स्व:तहून करणं त्यांना जमतं.....
याबाबतीत ’आउ, लकी आहेस तू’..................................


त्या दिवशी चार बॅगा खांद्याला लावून, एका कडेवर आता कुठे मान सांभाळायला शिकलेल्या पोराला घेउन वरच्या ताईला पुढे जाताना पाहिलं आणि तिचा जबलपूरचा ठोंब्या मागून केस सारखे करत येत होता, ते पाहून डोकं बाजूला काढून ठेउन द्यावंसं वाटलं.
आपण अशी, घरात अशी स्त्रीलिंगी-पुल्लिंगी विभागणी केलीच नाही नं, त्यामुळे हे असं काहीतरी बघितलं की भर उन्हात डोक्यात वीज तळपायला लागते .

तुला आठवतंय, पूर्वी तू शाळेत जाताना, मुळातच वाटाण्यासारखे असलेले डोळे अजून फ़ुगवून त्या दोन जणी बघत बसत नेहमी....एवढंच कशाला,... स्कूटीवर लेकीला पुढे बसवून ’ती’ भुरर्कन सुटायची, तिचा so called "male dominated' प्रोफ़ेशन मधला मोकळा वावर खडयासारखा यांच्या दाताखाली आलेला.
तुझा रोखठोक खाक्या आणि नाकासमोर चालण्याच्या वृत्तीमुळे भिंग लावूनही त्यांना काही सापडलं नसतं.

मात्र तिला असं बिनधास्त फ़िरताना पाहून आणि त्यातलं तिचं हळूहळू बसत चाललेलं बस्तान बघून आपापसात कुरकुरणा-या चकल्या आठवतात.....तिच्या संसारातले दोष त्यांना बरोब्बर दिसतात, अगदी तिच्या नव-याला वेळेवर जेवायला मिळत नाहीपासून ते लेकीची आबाळ होते अशा अथ ते इति चर्चा.........कसं गं एकाच तेलात असूनही यांना काटयाला काटे टोचतात म्हणून कुरकुरता येतं. खरी टोच वेगळीच असते....तिचं नशीब म्हणजे ’पाकातल्या पुरीसारखं’ त्यावर आपली दुखरी नस कुरवाळण्याचा हा प्रयत्न.....

त्यांनी आपल्या आहुती दिल्या गं पण यज्ञकमळं अजूनही राखेतच श्वास घेतायत, अजूनही समिधांचा करपून गेलेला वास जगू देत नाही. तू म्हणशील, कधी एवढी उमललीस??? पण हे फ़क्त स्त्रीवादीच्या आजच्या गुळगुळीत संकल्पनांमध्ये आपटी खाल्लेलं शहाणपण आहे.

उलटा नेसला काय नि सुलटा असला काय पदराखाली साडीची विरलेली वीण लपवता येत नाही गं .
तुकतुकीत त्वचेवरुन ओघळले तरी अश्रूंना वैयक्तिक फ़ारकती घेणं जड होतंय....मोजपट्ट्या लावून तुझं दु:ख किती अन माझं कोमेजणं किती असे व्यावहारिक भागाकार करताच येत नाहीत.


आपण काय करावं, थिजलेल्या जाणिवा मूकपणे पहात रहाव्यात आणि हुंदके तळाशी कोंडून ठेवावेत....काठ थरारेल क्षणैक........त्याचं सांत्वन करावं, होईल तो ही होईल शांत तरंगातून."


Comments

Bhagyashree said…
e chhan lihlays ! could completely relate to wt u r saying !
me said…
true very true! tuzi bhasha khupach chan aahe. changala marathi wachun khup aanand zala :)
me said…
पटकन एक कवीता पोस्ट करुन टाकली :) check, u may like it :)
p.s- thanks for visiting my blog :)
Sneha said…
apratim.... :)
कोहम said…
amazing....i am reading your blog for the first times. have to say, it is amazing
सखी said…
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद :)
Dk said…
ठोंब्या मागून केस सारखे करत येत होता, ते पाहून डोकं बाजूला काढून ठेउन द्यावंसं वाटलं. अगं मग बिनधास्त हाणायची एक हाय काय अन् नाय काय? :)

बादवे खर आहे लिहिलेल सारं पण आता परिस्थिती बदलत्ये गं थोडी थोडी

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट