चिरागदानं

ब्लॉग सुरु केल्यापासून, हावरट मुलासारखं मिळतील तेवढे सगळे ब्लॉग्स पाहून टाकले...वाचून झाले. एकदम आईस्क्रीम, टॉफ़ीझ,चिंचा,खेळणी एकत्र मिळाल्यावर छोटया पिल्लूचा चेहरा कसा हरखून जाईल नं तस्संच झालं. नुसते ब्लॉग्स नाहीयेत हे........ही चिरागदानं आहेत!!! चिरागदानं हा शब्द पेशवाईतला.....झुंबरांसाठी किंवा पूर्वीच्या काळी जी महाल प्रकाशित करण्यासाठी छताला लागून दिव्यांची काचेतली आरास असे त्यांना चिरागदानं म्हणतात. ही सुद्धा मनातली चिरागदानंच नाही का?

मनातल्या खोल,गूढ दालनात अधांतरी पाय ठेवावा आणि नंतर ही सुबक लेणी नजरेस पडून हरखून जावं असं काहीसं झालं माझं.....मनातली सरसहून सरस शिल्पं...काही सुबक, कोरीव शब्दनशब्द टिपून घ्यावा, तर काही अगदी आकार नसलेली पण वेडुकली तरी त्यांच्याशिवाय काहीतरी रितं राहिल्यासारखं वाटावं अशी....

गायत्रीचं लेखन....श्रीमंत करुन जाणारी भाषा, शब्दांचे चकवे, अनपेक्षित हळवेपण आणि नेमक्या क्षणी उंची गाठण्याची कला...सुंदर!! टयुलिपची वर्णनात्मक ओघवती स्टाईल...तिच्या दैनंदिनीत कुठेतरी स्वत:लाच पाहिल्याचे आभास करुन देते. संवादिनी सुमेधा, मंजिरी,....असे कित्येक आणि तरी अजून मुलांचे ब्लॉग्स वाचायचेत. :) या विश्वातलं मी म्हणजे अजून तरी, एक रांगत अंगठा चोखणारं बाळंच. आणि हे वाचताना म्हणजे अगदी, "हेच हेच म्हणायचं होतं मला".....असं कितीकदा तोंडून निघालं असावं. ’घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे’ त्या टाईप. पण ह्या इतक्या एकसे बढकर एक रायटर असताना एकटया अरुंधतीला booker award मिळावं????? हम्म्म्म्म...............

पण अशी सुंदर कवाडं खुली केल्याबद्दल समस्त ब्लॉगविश्वाला सलाम!!!

Comments

Manjiri said…
सखी, तू दिलेली दिलखुलास दाद भावली. आभार!
खरंच हे ब्लॉगविश्व मोठं अनोखं आहे. तुझ्या पदार्पणाबद्द्ल अभिनंदन. आणि मस्त मनाला भिडणारं लिहीशील ही सदिच्छा!

-मंजिरी
Unknown said…
awesome...awesome....N awesome......
too gud blog.....
keep writing ......!!!

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट