उगीच अस्फ़ुटपणे माझी फ़ुटणारी मी तुला ठाउक आहेच...पण माउ गं, डोशावरल्या वरवर पडणा-या कधी खरपूस वास सुटलेल्या जाळीसारखं होतं बघ माझं कधीकधी..निसतं उन उन पसरावं तसं कढलोण्यासारखं मी पसरत जावं आणि मग विरघळल्यागत एकजीव होउन जावं स्वगताशी.

खिडकीवर हलत राहतं उन, त्यातली उबदार झुळूक कुठं आतआत जाउन भिडते...शब्दांच्या वेणांसारखी आतवरच खोल पडून राहाते. धूळ साचलेल्या पानावर बरोब्बर मध्येच तुकतुकीत छोटी पालवी धुमारते....मग जुनी पालवी गळून का पडत नाही....की आपलं गर्द हिरव्या पानातून पोपटी कोवळेपण उठून दिसतंय म्हणून झाड काही निरोपाचे दिवे घेत नाही.

केशराच्या काडयांनी सजवलेल्या घट्ट खरवसाच्या वडीची आठव येते गं..आजी आत्ता येउन हातावर ठेवेल अन भरभरुन आशिर्वाद देईलसं वाटतंय....माघीच्या दिवशी भजनं ऐकली आणि लख्खं चकाकणा-या गणपतीच्या सोंडेवरलं फ़ूलंच होउन जावंसं वाटलं. मी वेळ नाही म्हणता म्हणता गार फ़रशीवर पाय टाकला आणि मग कळलं त्यादिवशी माघी चतुर्थी होती....कसं योगायोगाने पोहोचले नि तिथलीच झाले. जिंकल्या शुभंकर शक्ती....पण मी भांडलेच नव्हते कधी माझा विश्वास नाही म्हणत.....आस्तिक आणि नास्तिकाच्या खोल मृगजळाला पाय लावून आले इतकंच काय ते नास्तिकपण. हसून आणि मावळतीला भरुन घेतलं प्रसन्नतेने. उंच छताकडे आणि महिरपींवर सोड्लेल्या पिवळ्या शलाकांकडे ओझरतं पाहून वळती झाली पावलं......

Comments

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट