Tuesday, October 13, 2009

रेन ट्रीच्या झाडांवर लांबून पाहताना लुकलुकणार्‍या दिव्यांसारखी दिसणारी तुर्रेदार फुलं ऐटीत झाडांच्या टोकांवर पाणदिव्यांसारखी तरंगत असल्याचा भास होतो....शिरीषाच्या झाडाची एक कमाल वाटते मला, मंद रंगाच्या गुलाबी झुपक्यांनिशी त्याच्या वेंधाळ फांद्या वार्‍यानिशी हलतात तेव्हा कुठे त्याची फुलं पटकन नजरेत येतात. एरवी आकर्षून घेणारा रंग,पाकळ्या असा अलंकारिक जामानिमा नसला तरी शिरीष फुलांचं असणं निव्वळ आवडतं. साने गुरुजींच्या बालकथांपैकी एका पुस्तकात शिरीषाच्या फुलांचा एक छान संदर्भ होता...तेव्हापासून आजतागायत शिरीषाच्या फुलांचं आकर्षण तस्संच आहे.

त्याच्या सावलीतच बसलेल्या असतात त्या दोघी.

भुर्‍या रंगाचा पिनाफोर आणि त्यात त्याहून जरा फिक्कट शर्ट तो ही निळीच्या रंगाने निळकट झालेला...निळसर मळकट अशीच झाक आहे त्या रंगात. त्यांच्या रंगात बेमालूम मिसळून गेलेली. भुरकट केसांच्या घट्ट वेण्यांना काळ्या रिबीनी आणि फुलपाखरी पेड. एक जराशी सावळी दुसरी गव्हाळ. भेळेच्या पुडक्यात एकच ओलसर पुरी बुडवून खात, खिदळत त्यांची दुपार सटकते.
एकाच शाळेतल्या-आळीतल्या मैत्रिणी..,दोघी शाळा सुटल्यानंतर ठराविक घरातली दुपारची कामं आवरण्यासाठी निघतात. शिकण्याची हौस अशी फार नाही. पिना, रंगीत रिबीनी, क्लिप्स टिकल्या यांचा मात्र भारी शौक. गाडीच्या चाकाजवळ किंवा जवळच्या झाडाखालीच दिवसभर डोक्यावर घेतलेलं फडकं, तेच दुपारी तोंडावर घेउन लवंडलेल्या गाडीवाल्याच्या गाडीवर असं त्यांचं आगळंवेगळं विंडो-शॉपिंग सुरु असतं. गाडीवाल्यालाही सवय झालेली असते...आताशा तो त्यांना हटकतही नाही.

त्यांच्या गप्पांतून त्यांची माय, कुठल्यातरी शेठाणीकडे काम करते...तिच्याकडच्या शेल्फमधल्या वस्तू, तिच्या डायनिंग टेबलवरची क्रीम्स.....असे बरेच स्वप्नाळू तुकडे ऐकू येतात.
त्यात एखादी रस्त्यातून जाणारी गोरीपान जीन्स, टी शर्ट अशी मॉडर्न मुलगी दिसली की तिच्या जराही लव नसलेल्या त्वचेबद्दल, ड्रेसबद्दल त्यांच्या मनात एक टवटवीत कुतूहल जागं होतं. मोठ्या,पापणीदार डोळ्यातून ते आपसूक बाहेर पडतं.
आपली मोठी बहीण आय-ब्रो करणं कुठून-कशी शिकली, एका बाईच्या पार्लरमध्ये काम करताना जुन्या म्हणून कचर्‍यात टाकून दिलेल्या रंगीत बाटल्यामधलं क्रीम आणून ते कसं आठवडाभर पुरवून वापरलं हे सांगताना त्यांच्यापैकी एकीच्या कोरीव भुवया खालीवर होतात.

त्यातली एक लग्नाळू वयाची.. तिच्या आईने चार घरी कामं करताना तिचा विषय काढला तर ही चेहर्‍यावर कावरेबावरे भाव घेउन कोपर्‍यात उभी. मोठया बहिणीचा संसार, तिचा नवरा..न जाणोत कितीक जखमांची आठव दाटून आली असेल पण चेहर्‍यावर लग्न या शब्दासरशी कायम एक प्रश्नचिन्ह!
अबोध जाणीवांपलीकडे उत्तरं शोधणारे आपले आपणच..त्यांची उत्तरं कोणत्याही पुस्तकात सापडणार नाहीत किंवा शाळेत बाईही सांगणार नाहीत अशी मनातली निरगाठ पक्की करत, जगणारी ती ही एक.

त्या दोघी फक्त प्रतिकं..चालती-बोलती. त्यांच्यासारख्या बर्‍याच, किंवा त्यांच्याप्रमाणे बरेच.

त्या दोघी तसेच ’ते’ही. त्यांना काही शिरीषाचं झाड भावणारं नाही..पण सावलीसाठी आसुसलेलं शरीर आणि झाड ही सामाईक बाब.
निबर झालेल्या झाडाच्या खोडांसारखे, बोटाच्या पेरांतून मस्ती, रग असा परिस्थितीजन्य मेळ जमून आलेले पोरगेले तरुण. पोरसवदा वय म्हणावं तर चांगली वस्तर्‍याने भादरलेली मिशी. एकाने केलं म्हणून दुसर्‍याने वडिलांच्या ब्लेडने आहे नाही ते सगळंच सफाचट केलेलं. असं वर्गात गेलं की मुलींच्या बेंचवरुन खसखस ऐकू येते..आपल्या दिसण्याची दखल घेतली जाते असा समज करुन वेडया वयातलं पौरुषत्व मिशीपासून कानापर्यंत पसरतं.
तेच चारचौघात सर ओरडले की अपमान या नव्या जाणिवेमागून बाहेर पडू पाहतं...कानशिलं गरम झाली की कुणीतरी मागून कुजबुजतं....ए सावत्याचे कान बघ..साशासारखे लाल...खि: खी:.’ लाजेच्या उशीखाली तोंड लपवावं तर मुलगी समजून खिदळतील.... अशा अनेक संमिश्र भावनांच्या पालव्या फुटून झाड फोफावत जातं...नुसतंच.
पुस्तकांची हौस असो वा नसो तरी बाईंविषयी त्यांना अतोनात प्रेम असतं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हमखास एखादा गुलाबाचा गुच्छ, स्वत: तयार केलेलं ग्रीटिंग, एकदा तर बाईंना द्यायला गुलाब मिळालं नाही म्हणून त्याने हारवाल्याकडून निशिगंधाच्या फुलांचे दांडे घेउन तेच बदामाच्या पानात गुंडाळून दिले. त्यांची भाषा वारली, आदिवासी पाड्यातली....पटकन कळली नाही कळली तरी डोळे बोलके. पूर्ण गावभर शिव्या देत फिरलं तरी बाईंसमोर मोघम शिव्या द्यायच्या... शिव्या पूर्णपणे बंद करणं अवघड कारण जिभेला वळणंच तसं.
कधी पाण्याच्या टाकीत शिवांबू, कधी छपरावरची कौलं गायब असे एक ना अनेक खेळ. कुणी इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअर करण्यात एक्स्पर्ट, कुणाचं गॅरेज, तर कुणाच्या बाबांची वडापावची गाडी..
एखाद्याला पेपर टाकताना लाज वाटते, कुणी मुद्दाम बाईंच्या घरी पेपर टाकतो असं अभिमानाने सांगतो. एखादा कार्यकर्ता असतो...पक्ष अपक्ष आहे की नाही हे ही ठाउक नसतं. एखादा नुसत्याच मारामार्‍या करायला मिळतात म्हणून जातो. गॅरेजमध्ये काम करतो सांगण्यापेक्षा चारचौघांत सांगण्यासारखी असते, कार्यकर्त्याची पदवी.

माणूस वाढत कुठे जातो? तो फोफावत जातो...जन्माची मुळं मातीत आणि बाह्यांग आकाशाकडे. फोफावण्याची हौस फिटत नाही...पालवी नसलेल्या झाडाच्या फांद्यानाही.

त्यांच्या असण्यात स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी असं वेगळं प्रतिनिधीत्त्व करण्याची गरज भासत नाही. ती ती त्यांच्या त्यांच्या आयुष्यातली पात्रं, प्रत्येकाची कथा आहे..कथेच्या मध्यभागी ते आहेत किंवा नाहीतही.
पण त्यांच्या कथांशी, आयुष्याशी माझ्यातल्या एका गुणसूत्राची नाळ जोडलेली असावी.
विचारांनी????, भावनांनी????..............असेल. आहे म्हणण्याइतकं ठाम फार काही नाही, म्हटल्याने अधोरेखित केल्याचं चोरटं समाधान मिळेल असंही नाही.
तळ्याकाठी बसलेल्या विस्कटलेल्या केसांच्या बुडढ्यासारखे माझेही विचार विस्कटत, पसरत जावेत..त्याला ’भीष्म’ कल्पनेसारखा अंत नसावा.
आपण इथे नसतो तर कुठे असतो असे संन्यासी विचार एक चांगला कॅन्व्हास उभा करतात. डोंगरावर, किंवा एखाद्या गावात भटकताना छपरा-कौलाच्या शाळेत शिकवताना असं कल्पनाशक्ती काहीबाही रंगवत जाते..... पण असं फिरताना रापलेल्या केसांची, त्वचेची काळजी मी केली असती????(!!!!)
होsss...तेवढे कॉशस आहोत आपण आपल्याबाबतीत पण औटघटकेच्या चिंतेवर सहज मात केली असती. काय टिपीकल मुलगीपणाचं लक्षण आहे.........असं म्हणून!!!!

गावच का...ओसाडच का?.....इथेही अडचणीत असणारे लोक आहेत, इथेही बर्‍याच गोष्टी करण्यासारख्या आहेत मग गावच डोळ्यासमोर उभं राहण्याचं कारण काय....विचार मनात आला...त्यासरशी खल करुन झाला. स्वत:चंच स्वत:ला हसू आलं. आपलेही विचार स्वप्नाळू आहेत त्या दोघींसारखेच. झगडा सावलीसाठीच....फरक फक्त देण्या-घेण्यात आहे.

Monday, September 21, 2009

तात्या

आज्यो...बाssss', आज्योssबा’ कितीतरी वेळ आज्यो मधल्या ’ज्यो’ वर एक इनोसन्ट गिरकी घेत माझ्या अगदी समोर उभ्या असलेल्या माणसाच्या खांद्यावर त्याचं आजोबा पुराण चाललेलं. ठेक्यात चार पाच वेळा त्याच्याकडून आबोजा-बिबोजा असं कौतुक करुन घेतल्यावर आजोबानेही कपाळावरचा घाम पुसला. बराच वेळ त्याच्याकडे बघत बसल्यावर नंतर मलाही गरम व्हायला लागलं. ’काय पण जागा मिळालीये गुंफा बांधायला...’टेकडीवर चढून बांधायची ना..’ असा माझा मूक वैताग चाललेला.

गुंफा बांधायच्या, म्हणजे फक्त बांधून ठेवायच्या...डागडुजी करण्याच्या नावाने बोंब..पलीकडे ताटाएवढ्या भोकातून गळती सुरु, वावर नाही तिथे शेवाळं हौसेने वाढलेलं...नवरात्र, महाशिवरात्रीला हीssssss गर्दी. ’पुष्कळ जुन्या म्हणजे २००-३०० वर्ष जुन्या असतील नाही का’...कुणी म्हणायचा अवकाश लोकांचं पुढचं वाक्य असतं’ पांडवकालीन’ आहेत’..
?????????

२००-३०० वर्ष जुन्या पांडवकालीन कशा असतील.... बरं असल्याच तर पांडव इथे राहून गेले म्हणून प्लीज सांगू नका...जिथे जावं तिथे हेच ऐकावं पांडव अज्ञातवासात असताना इथे होते......अर्रे....याला काहीतरी प्रमाण? असं विचारायला जावं तर पुढचं उत्तर...’हो मग पांडव भारतभर फिरले होते..’

भारतभर फिरले होते म्हणून प्रत्येक बोगदा न बोगदा फिरले होते का......असा सात्त्विक संताप होउन विचारण्यात अर्थ नसतो. कारण या दंतकथा असतात. त्या माणसाला त्याच्या पणज्याने, मित्राने,आजीने कुणीतरी सांगितलेल्या असतात. कथेत राम आणि पांडव एकत्र नांदतात, वनवास, अज्ञातवासात फरक उरत नाही.
’सोड....मरु दे..तुला ऐतिहासिकता कळतंच नाही. पहिल्यापासून बायेझ्ड आहेस.’ सेल्फ टॉकमधून बाहेर पडण्यासाठी ते आजोबावालं पिल्लू दिसलं आणि थोडावेळ विसर पडला. लहान मुलं हा एकतर वीक पॉईन्ट त्यात ती रडत-बिडत नसतील तर दुधात साखर...

’आ नथी करवानु..’

आज्योबाssss म्हटल्यावर हा मराठी वाटला होता, हे काय मध्येच....म्हणजे माझ्या कल्पनेनुसार त्याचे वडील आणि बाजूला आजोबा अशी जोडगोळी आधी उभी होती. नंतर पूजेचं ताट वगैरे घेउन आई, आणि बहुतेक आजी वगैरे मंडळीही आली होती. पण मराठी आहेत याबाबतीत ठाम झाले होते. त्यात गोंधळ म्हणून आजोबा-आजी मराठीत, वडील हिंदी-गुजराती,..आई माहिती नाही अशी कोणतीही एक भाषा अशी देवाणघेवाण झाल्यावर कोडयात पडले. हे असं काय..........

कशाला हवेत वितर्क...असतील एकमेकांच कोणीतरी.

थोडया वेळाने आजोबा थकल्यावर बाजूला टाकलेल्या खुर्चीवर बसायला गेला.....पिल्लूचे डोळे भिरभिरुन त्याला शोधायला लागले. एवढा वेळ पांढरे केस विस्कटून, हातावर गिरक्या घेउन खेळवणारा आजोबा त्याला दिसेनासा झाला. इकडून तिकडून मान हलवून पाहिली....माझ्या आणि मागच्या रांगेतल्या लोकांकडे बघून झालं पण नाही....

बाबालाही आवरेनासं झालं... आणि गळ्यातून सूर निघण्याचा अवकाश आजोबा दिसला.....बाबाच्या खांद्यावरुन. हसूच हसू.........मग आजोबाला उठवून त्याच्याच खुर्चीत शेठासारखं टेकून बसला.

आजोबा दिसत नाही कळल्यावर मात्र त्याच्या पाच मिनिटासाठी कावर्‍याबावर्‍या झालेल्या अवस्थेत मीच अस्वस्थ झाले बरीच. खूप वर्षांनी ’आजोबा’ हा शब्द जगताना डोळ्यापुढे अनुभवला. आजी-आजोबांचं सुख कुणाला लाभतं, कुणाला अजिबात नाही. माझे आजोबाही खूप ग्रेट होते का?.........म्हटलं तर हो!

सगळ्यांचेच ग्रेट असतात, तरीही आपल्या आपल्यापुरते आपले तेच सगळ्या विश्वात ग्रेट असावेत.

इकडच्या आणि तिकडच्या दोन्ही घरी लहानपणी आजोबा-आजी दोघंही. एक नाना आणि दुसरे तात्या.

नानांशी कधीही जवळीक निर्माण झाली नाही....भितीमुळे?...असेल. बहुतेक त्यांची आजारपणामुळे सारखी चीडचीड होत होती म्हणूनही असेल. पण त्यांच्याशी सूत जुळलंच नाही.

तात्यांबरोबरचा मात्र माझ्या आयुष्यातला छोटासा आजोबा-नातीच्या विश्वातला तुकडा आजही जपून मी ठेवलाय. पण आठवणींचे काही बरेच तुकडे जिवाला सुकून देणार्‍यापैकी असावेत पण तात्यांच्या आठवणी प्रत्येक क्षणी केवळ अस्वस्थच करुन जातात.

भूतकाळात म्हणून रमून यावंसं वाटलं तरी माझ्या वर्तमानात माझा गॉडफादर माझ्या जवळ नाही ही जाणीवच मुळात खूप त्रासदायक ठरते. त्यांच्या आठवणीत रमणं जाणून, उमजून टाळण्याचा माझा प्रयत्न असतो. अर्धुकात असल्याची जाणीव चिमटा काढून कुणीतरी समोर दाखवावी तसंच काहीसं होतं.

तात्या म्हणजे पहाडासारखा मनाने मजबूत तरीही जिंदादील, खळाळत्या झर्‍यासारखा प्रवाही माणूस.
माझ्या स्मृतीतल्या तात्यांचा कधीही देवादिकांवर विश्वास नव्हता. पण सुट्टीत मी रहायला गेल्यावर, आजीला पूजेसाठी फुलं गोळा करायला मी आणि तात्या अशी जोडी पहाटे पहाटे बिल्डींगखालच्या बागेत निघायची. प्राजक्ताचं नवं झाड, तेव्हा त्याचा भरभरुन सडा पडायचा., लालचुटुक जास्वंद आणि तगरीची फुलं अशी नेहमी ठरलेली फुलं बास्केटमध्ये गोळा करण्याचं मला वेड होतं. हार करताना आधी दोर्‍याच्या शेवटच्या टोकाला एका हाताने गाठ कशी मारायची हे तात्यांनीच दाखवावं.

एकदा...बागेत प्राजक्ताच्या झाडाखाली फत्कल मारुन आजूबाजूची टप्पोरी फुलं वेचता वेचता वेचता ती संपली...म्हणजे लवकरच संपली...अर्धी परडी भरण्याच्या आत. आता हारासाठी उरलेली फुलं कुठून आणायची.. प्राजक्ताचा मोतिया पांढरा हार तर आजी बाळकृष्णालाच घाली.,तो कुठून पूर्ण करायचा अशा जगावेगळ्या शंकेने अस्मादिक जमिनीवरच बसून..उठायचं मनच होईना. आजूबाजूला फिरणार्‍या तात्यांचाही क्षणभर विसर पडला...

आणि अगदी थोड्याच वेळात फ्रॉकच्या खळग्यात चार-पाच ओलसर फुलं घरंगळली. चटकन नजर बाजूला
फिरायच्या आत....दोन तीन, चार.....बरीच फुलं जागोजाग...आणि समोर तात्या झाड गदागदा हलवत, मिश्कील हसत उभे होते.

या आठवणीची तीव्रता इतकी आहे की कुठल्याही पेचात अडकण्याची जाणीव व्हायचा अवकाश तात्या माझ्या जवळ नाहीत हे वाटून मन कळकळून उठतं.
मी आणि सावळी पण गोबर्‍या गालाची अपूर्वा आम्ही आणि तात्या आणि काळ्या-जांभळ्या रंगाची दोन रुपयाची पेप्सी....कधीही, कुठेही!
गृहपाठाच्या वह्या तात्यांकडे चेक करण्यासाठी म्हणून गेल्या की वहीवर १०००/१००० V.Good असा रिमार्क.......... :) निखळ आनंद देण्यात तात्यांचा वाटेकरी अजून जन्मला नाही.

एका पहाटे फोन खणाणून तात्यांना बरं नाही असा निरोप यावा...भोवताली सगळ्यांचे चेहरे गंभीर व्हावेत.
’त्यात काय एवढं?....बरा होईल तो आजारीच आहे ना!’

रिक्षातून थेट त्याच्या बिल्डींगपाशी.....खालून जाताना त्या दिवशी प्राजक्ताचं एकही फूल जमिनीवर दिसू नये हा निव्वळ योगायोग असेल, किंवा काहीही.
घरी जाताक्षणी शुभ्र चादर घेउन, उदबत्तीशेजारी झोपलेल्या तात्यांना मी पाहिलं.
"त्याला काय झालंय?"
"त्ते देवाघरी गेलेत."
"का?"
".............."

जाउ दे, असेल गेला असेल फुलं आणायला.
गेला तो गेला. त्यानंतर फुलांचा सडा पडत राहिला पण मी गोळा करायला गेल्याचं मला आठवत नाही.

आजच्या घडीला ते झाडही नाही अन तात्याही!

Friday, September 4, 2009

बाल्कनी : २

गजा काकू म्हणजे ठेवल्या नावाला वजनानिशी जागणारी बाई! काकूंची दृष्टी अलौकिक, गजाआडच्या सृष्टीचा अंदाज घेणारी.

"बाल्कन्यांवर भारी नजर या बाईची, नवीन साडी आणून वाळत घालायची खोटी..यांना कळलंच!" इति नवरत्ने.

"इतनीभी बुरी नहीं है गजाजी।" इति सोनी. (सोनींना सोसायटी आणि सोसायटीला सोनी नवख्या होत्या त्या काळापासूनची त्यांची गजाकाकू ही मैत्रिण. त्यामुळे तसा त्यांचा काकूंबाबतीत सॉफ्ट कॉर्नर होता.)

"मामींचं नाक काय तीक्ष्ण आहे हो..परवा मी हे टूरवर जाणार म्हणून कडबोळ्या करायला घेतल्या, आपसूक बातमी लागल्यासारख्या ह्या आल्या..म्हणे शिल्पे खमंग वास येतोय बाल्कनीतून. आज काय निलेशराव स्पेशल वाटतं..., मग रेसिपी लिहून घेउन, चार टेस्ट करण्यासाठी म्हणून घेउन गेल्या. खूप छान झाल्यायत म्हणाल्या." शिल्पा-निलेश सोसा.तलं नवदाम्पत्य..शिल्पा त्यांना आवर्जून मामी म्हणते.(अजूनही).

"सुनंदे, मेले डोळे आहेत की फुंकणी? जाळ काढशील बघता बघता..." इति बेळगावची म्हातारी. तिला एकटीलाच फक्त काकूंना अशा प्रकारे बोलण्याची सवलत होती. त्यामागचं गुपित-गोटाकडून कळलेलं कारण म्हणजे..बेळगावच्या उत्तरेला का पश्चिमेला पाच कि.मी. अंतरावर गजाकाकूंच्या मावसाआजीचं गाव..,दोन्ही घरात पूजा सांगायला येणारा भटजी एकच. त्यामुळेच हे एरवी विळ्या-भोपळ्याचं वाटणारं सख्य सलगी टिकवून होतं. काकूंना 'सुनंदेssssssss' अशी हाक मारणारीही एकटी म्हातारीच.

गजाकाकूंचं खरं नाव ’सौ.सुनंदा चौगुले.’ गजू काकांची सख्खी बायको...म्हणून ती गजा काकू.

आता ’गजेंद्र’चं आधी गज्या आणि मग गज्जू असं उकारान्ती बारसं केलं ते सोसा.तल्या पोरासोरांनीच. ते बच्चेकंपनीत एकदम फेमस. स्वभावाने इतका प्रेमळ माणूस अख्ख्या आळीत नसावा. कानिटकर आजोबा गमतीने काकांच्या तुळतुळीत टकलाकडे निर्देश करुन डोळे मिचकावत म्हणायचे..

"या सगळ्या उकारान्ती कोंब फुटलेल्या नारळाचं पाणी बाकी गोड असतं कायम." ;)

पण गज्जू काकांच्या या प्रेमळ स्वभावाबाबत कुणी काकूंसमोर भरभरुन बोलायचा अवकाश त्या फणका-याने म्हणत.,

"चौगुलेंचा संसार सांभाळणं काही वाटतं तेवढं सोप्पं काम नाही...हम्म..बाहेरच्या जगासाठी प्रेम उतू जाईल पण घरात साधा कौतुकाचा शब्द नाही."

असं म्हणता काकूंच्या चेह-यावर हिटलरच्या बायकोची अगतिकता फिकी पाडतील असे आविर्भाव दाटून येत. वास्तविक पाहता हिटलर आणि काकांची वंशावळ प्रयत्न करुनही जोडणं अशक्य!

"असतो हो एखादीचा हिटलर वेगळा आणि असतं त्याचं प्रेम जगावेगळं..तुम्ही नका मनाला लावून घेउ एवढं." कानिटकर म्हणजे कानिटकर :) कानिटकरांचे ’वन लाईनर्स’ ज्याम खसखस पिकवायचे. त्यांच्या स्मार्ट लाईनर्स ना बॅकग्राउंड मुजिक द्यायला पाहिजे असं आद्याला राहून राहून वाटे.

तशा भरारी पथकात ऍडमिशन घेतल्यासारखं आद्याचं माईंड भलतंच उडया मारायचं कल्पकतेत, उत्साहात...अगदी सगळीकडे. पण त्याच्या भरारी पथकाचा गाईड नवरत्ने असल्यामुळे त्याला उगीच अधूनमधून पंख छाटलेल्या पाखरासारखं वाटत राही.

तशी एरवी नवरत्ने म्हणजे ’रत्नांची खाणच! पण वेळीच कदर केली नाही तर अशा रत्नांचं तेज फिकं पडतं. हा माणूस सुरक्षा दलातच खरं तर भरती व्हायचा..पण छ्या!!!

नवरत्नेंच्या फेमस डबल लॉक सिस्टीमबद्दल त्यांची दोन महिन्यांनी येणारी बोहारीण सोडली तर सगळ्या गावाला ठाउक.
म्हणजे सोसायटीतल्या मुलांनीही चोर-पोलीस खेळताना नवरत्नेंच्या घरी चोर म्हणून घुसणं बंद केलं होतं.

"ए लत्नेंच्या दालातून कूsssक्क नाही कलायचं..चोल कुठला...दबल लॉत आहे ना त्यांच्याकडे." कानिटकरांची नात..
एवढा बोलबाला केल्यावर चोराची काय बिशाद त्यांचं डबल लॉक तोडून आत यायची.

"ते तुमच्या डबल लॉकची साली काय भानगड आहे हो रत्ने?"

आरेच्च्या!! खेटेंना सांगायचं राहिलंच की...नरत्नेंना उगीच ओशाळल्यासारखं झालं....ऍडव्हान्स पे केल्यामुळे गडबड झाली बहुतेक, असा विचार त्यांच्या मनात डोकावून गेला.

तीन सोसायटयांमध्ये दुधाच्या पिशव्या टाकणारे ’कृष्ण-सुदामा दूध सप्लायर्स’चे मालक ’अभिराम खेटे’. वास्तविक नवरत्नेंच्या गॅलरीच्या मागच्या अंगाला लागून असणा-या दुसर्‍या सोसायटीत राहणा-या शहांच्या घरी दूध टाकणा-या पोर्‍याने खेटेंना नवरत्नेंच्या पॉप्युलर डबल लॉकची बातमी पुरवली. आणि बाल्कनीतल्या दुधाच्या पिशव्यांच्या वाढत्या चोर्‍यांनी मेटाकुटीला आलेले खेटे एकदा चौकशी करायला आले.

"आधी हे असले सिक्युरिटी वगैरे भानगडींवर विचार करायची गरजच नव्हती हो,..."

यावर नवरत्नेंनी प्रश्नार्थक चेहरा केल्यावर खेटे पुढे म्हणाले,

"हां म्हणजे तेव्हा आपल्या घराच्या पाठीमागे चावकेचं घर होतं ना......"
खालच्या बाजूने मिशीला यू टर्न देत देत खेटे पुढे उद्गारले..,

"आता चावके म्हणजे आपला मुं. पो चा माणूस, ...त्यामुळे चोर, भुरटा सालं कुणाचीही यायची डेअरींग नव्हती. आपल्या घराच्यामागचा ’वालच’ जळला चावकेचा ना, आपण बिनधास्त होतो. आपणच काय सगळी सोसायटीच निर्धास्त झोपायची म्हणा.
हा वाल काय प्रकार आहे असा प्रश्न रत्नेंना पडायच्या आत तिथे बसलेल्या आद्याने शंकानिरसन केलं....

"काका, वॉल म्हणजे भिंत म्हणायचंय त्यांना. "
"पण काय हो, म्हणून काय तुमची ती ’तटबंदी’ काय....." आद्याने खि: खी करुन विचारलं. त्यावर दोन मिनिटं स्तब्धतेत गेली. मग डिशमधला चिवडा उचलत खेटेंनी जोर्रात ज्योक कळल्याच्या आविर्भावात खॉ खॉ केलंन.

खेटेंच्या सोसायटीचं नाव ’तटबंदी’ का आहे या कोडयाची उकल झाल्याने खरं तर आद्याने खुशीत येउन विनोद मारला पण खेटे आणि नवरत्नेंसारखे प्रेक्षक असल्याने त्याचा मूड गेला आणि परत कानाची भोकरं बुजवून त्याने गाण्यांवर कॉन्सन्ट्रेट केलं. खरं तर तो वैतागला होता. त्याची फेव्हरिट आर.जे दोन दिवसापासून गायब होती. त्यात नवरत्नेंनी त्याला सोसायटीच्या कामात गुंतवून ठेवलं होतं.

आद्याच्या एक्स्प्लनेशनवर
"अच्छा!!...." म्हणून नवरत्नेंनी पुढे कंटिन्यू करण्याचा इशारा खेटयांना दिला. नवरत्नेंना सुरक्षा, सिक्युरिटी, कायदे याप्रकरणी खास इंटरेस्ट असे नेहमी. त्यांच्यासारख्या माणसाला निव्वळ उंचीच्या कारणावरुन डिसक्वालिफाय करुन सिक्युरिटी बोर्डाने एक उत्तम वाय, झेड दर्जाची सिक्युरीटी पुरवू शकणारा माणूस गमावला होता.
"तर त्यामुळे..........."खेटयांनी परत सुरुवात केली,

"म्हणजे बघा...या चावकेमुळे काय प्रॉब्लेम नव्हता...पण तो मोजून चार महिने, चार दिवसांपूर्वी रिटायर झाला.(खेटेंचा महिन्याचा हिशेब पक्का असतो..बिलात कधी पंचवीस पैशाचीही गडबड होत नाही.)
तर हा रुम रेन्टवर देउन त्याच्या मढ आयलंडच्या बंगलीत रहायला गेला.,आणि तेव्हापासून सांगतो...चोरांचा हा सुळसुळाट.
जसे चोर खरंच चावकेंच्या वाड्यातून बाहेर पडण्याची वाट बघत होते असं काहीसं वर्णन करुन खेटेंनी गोष्टीला शिवकालीन आभास आणला. त्यांच्या चिरेबंदी वाडयाची तटबंदी धोक्यात असल्याचं जाणवेल इतकं खरं चित्र काही काळ त्यांनी उभं केलं. मध्येच एखादा टर्न इंटरेस्टींग वाटून आद्या आणि प्रामाणिक श्रोत्यासारखे नवरत्ने आलटून पालटून ऐकण्यात दंग झाले.

"खेटेंची गोष्ट संशयाच्या मार्गाने पुढे सरकली आणि चोर दुसरा तिसरा कुणी नसून त्यांच्याशी धंद्यात रायव्हलरी असणा-या ’सुकेतु डेअरी’ वाल्याचा बोकाच असावा,अशा निष्कर्षाप्रत ते पोहोचले.

"च्या मारी बोका...?" आश्चर्य मिश्रित संशयाने आद्याने विचारलं.

"काहीतरीच काय खेटे,..पण कुठला ’मिल्क बिझनेसमॅन’ बोका ठेवीलच कशाला?"..नवरत्नेंना ह्या ना त्या कारणाने हुशार पदव्या सुचत.

" हा काय त्याचा स्वत:चा बोका नाय..." खेटे.

"मग??" कधी नव्हे ते आद्या आणि रत्नेंचे सूर एकत्र जुळले.

"हा त्याच्या पणज्याने इंग्लंडहून आणलेला गिफ्टेड बोका आहे...काय साधासुधा नाय. स्वत:च्या घरी चोरी जन्मात करायचा नाय तो."

"ब्रिटिश कुठले....स्वत: गेले पण इथे बोके सोडून गेले." नवरत्ने उद्वेगजनक संतापाने म्हणाले.
"ते काही नाही...असल्या बोक्यांच्या आयातीवरच बंदी घातली पाहिजे सरकारने...आज एक आणलाय उद्या त्याची पिल्लावळ होईल..मग वाढलेल्या संख्येने भारतात पाय रोवून बसतील." संतापात त्यांना आपल्याला बोक्यासारखे पंजे नसल्याचं दु:ख झालं.
बोक्यांच्या जातीबद्दल, संभाव्य धोक्यांबद्दल अजून काही चर्चा झाल्या....आणि मग नवरत्नेंकडून डबल लॉकची माहिती घेउन खेटे गनिमी कावा वगैरे रचल्याच्या आवेशात निघून गेले.

आपल्या डबल कोट सिक्युरिटीचं वाढतं महत्त्व पाहून रत्ने मनातल्या मनात खुश झाले. तिथून सुटका झाल्यावर आद्या थेट बाल्कनीत जाउन बसला. त्याच्या भरारी घेणा-या मनाला उभारी देणारी त्याची एकमेव जिवलग गॅलरी. गॅलरीतून समोर उभ्या राहणा-या टॉवरमधल्या फ्लॅट घेण्याची स्वप्नं रंगवणं हा त्याचा टाईमपास!

Monday, August 17, 2009

बाल्कनी : १

’बाल्कनी’ म्हणजे बाल्कनी ! बैठ्या सोसायटयांमधल्या घरकर्‍यांचा जीव की प्राण, म्हणजे जीव गेला तरी प्राण बाल्कनीत शिल्लक असं काहीसं बाल्कनी उर्फ गॅलरीचं पूर्वीचं ग्लॅमर. त्यातली मानाच्या गणपतीसारखी ’मानाची गॅलरी’ म्हणजे ’डी’च्या रुमची गॅलरी. ऐसपैस, मोकळीढाकळी सेम सोसायटीतल्या बायकांसारखी.
तशी सोसायटीतल्या प्रत्येक घराला बाल्कनी, पण ती पुढे-मागे असण्यातली गोम फक्त सोसायटीकरांनाच ठाउक. हाउसफुल्ल शो चं तिकीट काढताना नाटक आणि सिनेमा यातली गल्लत बराच काळ चुटपुट लावू शकते तशीच जागा घेताना बाल्कनी पुढे-मागे असण्याचं महत्त्व लक्षात घेतलं नाही तर आयुष्यभराची खंत गॅलरीत पुरून जगावं लागतं.

बाल्कनीच्या घराचं प्रेस्टीज फार...म्हणजे ’विवाह नोंदणी कार्यालयाने ’मुलगा स्वतंत्र नाही पण राहत्या घराच्या बेडरुम सेपरेट’ अशी’ आकर्षक’ ऍड द्यावी तसं सोसायटीकरांनी उपवर मुलीच्या पित्याला ’आमची ’डी’ची रुम, विथ अटॅच्ड बाल्कनी/बाल्कनी अटॅच्ड’ असं सांगून उपकृत करावं. गॅलरीवर लोकांचं असं प्रेम!! एवढं की शेलाटेंसारख्या अभिमानी मध्यमवर्गीय माणसाने संपूर्ण आयुष्यच गॅलरीत ’संगणकी शिकवण्या’ घेत वेचलं.

तर सांगायची गोष्ट ही की माणसांमुळे घराला घरपण येतं तसं ’गॅलरी’मुळे त्याला ग्लॅमर येतं. असा ’सोसायटयांमधल्या मध्यमवर्गीयांचा’ एक समज ! पण मध्यमवर्गीय म्हणजे असे तसे ’कॉन्ट्रीब्युशन काढण्याच्या वेळी ’मध्यमवर्गीय आव’ आणणारे उच्च-मध्यमवर्गीय नव्हे बरं!!( मध्यमवर्गीयांमध्ये मध्यम, उच्च, कॉन्ट्रीब्युशनच्या लेव्हलचे असे काही प्रकार आहेत, जसे मिरच्यांमध्ये झोंबण्याच्या श्रेणीनुसार भोपळी मिरची, पोपटी मिरची, हिरवी, ठेंगणी, बेडकी मिरची, इत्यादी.)

तर हाडाचे मध्यमवर्गीय म्हणजे शेलाटे! हा गृहस्थ भारी कमिटेड माणूस! लग्नाआधी न कंटाळता प्रियकराने प्रेयसीची वाट पहावी तसा हा रोज बशीची न चुकता थांब्याच्या थोडं अलीकडे रांग लावून वाट पाहतो. आणि बशीनेच घरी जातो.. तीनचाकीचा त्यांना भयंकर तिटकारा.

आम्ही सोसायटी सोडल्यानंतरही शेलाटे बर्‍याचदा थांब्यावर दिसतात, एका हातात फळांची पिशवी, दुसर्‍या खांद्याला बॅग! अशी शेलाटेंची स्वारी रोज घर ते बस अशा वार्‍या करताना हमखास दिसते. ते पाहून मध्यमवर्गीय माणूस अजून संपलेला नाही याची हमी मिळावी.
त्यांचं बाल्कनीकडे मनापासून ओढा, म्हणजे त्यांनी फावल्या वेळात शिकवण्या लावल्यापासून अधिकच!
असा बाल्कनीचा दुहेरी ( कदाचित आतापर्यंत तिहेरी*) असा उपयोग करणारे शेलाटे पाहिले की टाकाउपासून टिकाउ ची संकल्पना शेलाटयांइतकीच जुनी असावी असं वाटावं. त्यांच्याविषयी आणि अर्थात त्यांच्या अर्थार्जन करणा-या गॅलरीबद्दल अलीकडेच बोलताना आमचे तिकडून इकडे स्थायिक झालेले तरीही गॅलरीकरच असणारे शेजारी कौतुकाने म्हणाले, ’शेलाटयांना त्यांच्या जिद्दीनेच तारलं हो!!’ तर असे हे शेलाटे .................सॉरी ’गॅलरीप्रेमी शेलाटे’.

त्यांची बायको सौ. शेलाटे वहिनी किंवा सुहासची आई...अशी त्यांची ओळख. एकमेव सौज्ज्वळ काकू. त्यांच्या अंगणातल्या माडाला नारळ लागले तेव्हा हौसेने काही ठराविक घरातच वाटायला आलेल्या. (वास्तविक अशा गोष्टी ठराविक घरांपुरत्याच मर्यादित रहात नाहीत.) ’हे आमच्या गॅलरीसमोरच्या अंगणातले नारळ’ असं दोन-तीनदा म्हणाल्या. म्हणजे खरं तर ही बाई अशी गॅलरीला पुढे करणा-यातली नाही मग सतत आपलं गॅलरीपुढच्या अंगणात’ चा धोशा का.....असा प्रश्न पडावा. मग थोडया वेळाने गजाकाकूंचा प्रेझेन्स लक्षात घ्यावा.

म्हणजे शेलाटेंनी गॅलरीचं नाव घेतलं की गजाकाकूंच्या चेह-यावर ’बिब्बा घालून कुपथ्य झाल्यावर तडकल्यासारखे भाव! त्यांच्या बागेत न उगवलेल्या मिरच्या झोंबून यांचा नाकाचा शेंडा लालेलाल! (जातिवंत बेडगी मिरचीसारखा).
त्याला कारणही बाकी तसंच!.....त्यांच्या गॅलरीच्या ’भिंतीला भिंत’ लावून टेकलेल्या मागच्या आळीतल्या मुणगेंनी त्यांचं घरावर माडी बांधली( विभू म्हणतो ’माडी इझ सो बॅकवर्ड...कॉल इट वन प्लस वन’...मी मान डोलावली.) तेव्हापासून गजाकाकूंच्या बाल्कनीचं स्वातंत्र्य गेलं. हवा, पाणी, बातम्या सगळंच बंद!!
तेव्हापासून त्यांची हवा, पाण्याविना घुसमट अशी शेलाटेंच्या बाल्कनीवर निघते.
तेव्हापासनं त्यांची घारट नजर आपल्या बाल्कनीला लागू नये म्हणून शेलाटे काकूंनी त्यांच्या बाल्कनीसमोरच्या बागेत लिंबू, मिरच्या लावल्या....तरीही ओव्हरप्रोटेक्शन म्हणून निवडुंगही!


---------क्रमश:

Tuesday, August 4, 2009

देठाफुलाची गोष्ट

आमचा विभू म्हणजे अगदी छोटं छोटं गोरंपान बाळ होतं तेव्हा...

त्याला मांडीवर घेउन गप्पा चालल्या होत्या आमच्या, म्हणजे त्याला फक्त ही ही हु हु, आणि फारतर फार जोरात रडता येत होतं, आणि मला एखाददुसरी अंगाई म्हणता(ऐकवेल इतपत गोड आणि गायला सुरु करायचा अवकाश फार काळ अंत न बघता त्याला पटकन गुडुप्प झोप येईल अशी) येत होती.

त्याचा बोलण्यासाठी प्रयत्न मात्र सुरु झाला होता. काहीतरी बघून खुद्कन हसण्याचेही खेळ चालले होते. अचानक त्याच्या तोंडून बोबडी हाक ऐकली....आणि दोन सेकंद कानांवर विश्वासच बसेना. तश्शीच टुण्णकन उडी मारुन धावत आईला सांगायला गेले.

"आई, विभूने हाक मारली ती ही माझं नाव घेउन, hehhe ’आई’ म्हटलंच नाही आधी त्याने..टुकटुक..मज्जा."

आईलाही ऐकून गंमत वाटली होती. आम्ही म्हणजे काय आसमंतातच....कुणी अभ्यास बिभ्यास न करता डॉक्टरेट दिल्यासारखा आनंद झाला होता. आपण काय म्हटलं हे त्याला कळण्याची सोयच नव्हती. तो आपला मस्त सतरंजीचं एक टोक तोंडात पकडून माझ्याकडे पाहून हसत होता.

यानंतर एक आठ नउ वर्षांनी.....

.

.

.

.

आमची नेहमीसारखीच उतास जाईल इतकी वादावादी ऐकून आई वैतागली होती.

"काय चाललंय तुमच्या दोघांचं?...घर म्हणजे कुस्तीचा आखाडा आहे का...वगैरे वगैरे.."

"आई, मी त्याला सोडणार नाहीये. त्याने माझ्या नावाची वाट लावलीये. ह्याने आयुष्यात सर्वप्रथम माझंच नाव घेतलं होतं का असा प्रश्न पडलाय मला."

खरंच....त्याने आश्चर्याने विचारलं.

"हो..."मी ऐटीत कॉलर ताठ केली.

"ओह.......मग चल शहाणी पिझ्झा हटचा पिझ्झा लागू" ;)

"ए शहाणा कुठला......"

इयत्ता चौथी : स्कॉलरशीपची परीक्षा देउन आल्यावर

"आई, गणपती कोणत्या महिन्यात येतात?"

"भाद्रपद...का? आपण काय लिहून आलात?"

"श्रावण..."

बाजूला बसलेल्या मला हसू आवरेना.

"ए हसू नको....मी विचार केला गणपती येतात तेव्हा पाउस असतो आनि इलोक्युशनमध्ये परवा श्रावणावरच बोललो,त्यात होतं पाउस पडतो म्हणून, दिलं ठोकून.."

"शाब्बास, मेरे इंग्लिश के पाप्पड...काय पण लॉजिक आहे. चुकून बाहेर सांगू नको आई मराठी शाळेत शिकवते म्हणून." :D

"..........."

तो इंग्लिश मिडीयममध्ये असल्याने त्याचं मराठी सणवार, महिने या आणि एकंदरीतच सगळ्या पार्श्वभूमीवर टोमणे मारण्याची एकही संधी मी सोडत नाही.

इयत्ता आठवी

"ताई, गेस वॉट..."

"काय?"

"मी ज्ञानपीठची एक्झाम दिली होती ना.."

"त्याचं काय?’

"मी महाराष्ट्रातून पहिला आलो."

तो संपूर्ण दिवसभर धम्माल केली..आणि संध्याकाळी त्याला कोपर्‍यात घेउन विचारलं,

"आर यू शुअर? तो पेपर मराठीचाच होता? कारण मला अजूनही श्रावणातले गणपतीच आठवतायत. ;)"

त्याला वेगवेगळ्या फेजमधून जाताना अनुभवणं ही खरी मजेशीर गोष्ट असते, तो एक माझाही अनुभवच असतो. अलीकडेच त्याने विचारलं,

"तुला देव प्रसन्न झालाच तर काय मागशील?"

"तू काय मागशील?"( प्रश्नावर प्रतिप्रश्न करण्याची मोठ्या माणसांची खोड मलाही लागलीये)

"यू सी, मला फेडररसारखं व्हायचंय...................."

त्याची लांबलचक यादी ऐकून मला माझीच शाळा आठवली. त्यावेळीही अशीच ’व्हॉट विल यू डू इफ..’ च्या उत्तरादाखल एक मोठी लिस्ट केली होती.

"सांग न...काय मागशील?"

"अं.......सोचना पडेगा..बरं झालं आठवण केलीस ते, नवीन यादी करावी लागेल."

मनातल्या मनात प्रत्येक मोठया झालेल्या माणसाला म्हणावंसं वाटतं तसंच ’अशा निरागस स्वप्नं दाखवणा-‍या वयातून लवकर बाहेर येउ नकोस’ एवढंच मागावंसं वाटतं .

Friday, July 31, 2009

सकाळी भरभर कामं उरकून आई घराबाहेर पडली, तिच्या जाण्याच्या वेळा हल्ली हल्लीच अनिश्चित व्हायला लागल्या. घरातली सगळी कामं उरकता उरकता दमछाक होणं हा काय प्रकार असू शकतो ते घरात स्वत: बिनकामाचे पडलेलो असल्याशिवाय कळण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो.

एरवी कॉलेजची बॅग लटकवून मी आणि नंतर शाळेचं ओझं घेउन विभू घरातून बाहेर पडतो, आपल्याच विश्वात रममाण होण्यासाठी. मागे उरते फक्त आई......घराबाहेरचं आपलं असं एक रुटीन सुरु झालं की आपल्या मागे घरी उरणा-या माणसाच्या कामाबद्दल फक्त कल्पना केल्या जाउ शकतात किंवा अंदाज बांधले जाउ शकतात.

म्हणजे शेव-पुरी,पाव-भाजी किंवा पिझ्झा असे नॉट सो कॉमन मेन्यू संध्याकाळच्या जेवणात मेन आणि फायनल लिस्टवर असतील तर त्याच्या तयारीपासून अर्थात सगळ्या गोष्टी तीच करते( कारण मला वेळ नसतो, घरी असले तरी इतर बर्रीच कामं म्हणजे.. ऑरकुटींग-टॉरकुटींग...कालच भेटून झालेलं असलं तरी आज कमीत कमी १५ मिनीटं फोनवर मारण्यासाठी विषय असू शकतात इ. इ. ). ती मात्र तिच्या कामाशी १००% डेडीकेटेड असू शकते कधीही,केव्हाही......थोडक्यात आई ही ग्रेटच असते. :)

मास्टर्स च्या ऍडमिशनमुळे या सगळ्या रुटीनमध्ये एक खंड पडला फार मोठठा;( इतका मोठा की मी आयुष्यात कधी म्हणून ब्रेक घ्यायचा नाही असं आत्ताच ठरवून टाकलंय :P)....ज्याचा मी यथायोग्य वापर केला; तरीही बरंच काही अजून करता आलं असतं, रादर येतं हे मला वाटतंय आत्ता,या क्षणी लॉन्ग टर्मची सुट्टी संपण्यासाठी हातावर मोजण्याइतके दिवस शिलकीत असताना.

आणि सकाळी आल्याचा वाफाळलेला कप तोंडाशी लावला असता मला माउ म्हणते तसं ’हॅपी रिअलायझेशन’ झालं. बरीच कामं हाता-तोंडाशी असताना अजून वेळ आहे म्हणून मी तात्पुरती टांगून ठेवली होती ती पूर्ण करणं मस्ट आहे असं जाणवलं......

काही जाणीव होण्याचा अवकाश मला क्लीनलीनेस अटॅक्स येतात. त्यासरशी सगळी टीपी कामं आवरुन शेल्फ आईच्याच शब्दात ’नीटनेटका’( नॉर्मली तो शाळेतून घरी येण्याआधी मुलं फुटबॉल खेळायला जातात तेव्हा घरी येताना जो अवतार होतो तसाच असतो) करायला घेतला.

वार्डरोब( म्हणण्याची फॅशन आहे, नाहीतर कॉलेज गोईंग गर्ल चा फील येउ शकत नाही) मधले कपडे पाहून तीन एक महिन्यात तो ही अपडेट करायचा असतो हे कळून चुकलं. ( कळून चुकणे हा शब्दप्रयोग म्हटला तर भारी....म्हणजे कळून परत चुकीचंच वागणे :D )

दुपार अस्ताव्यस्तपणाला शिस्तीत आणण्यात व्यस्त गेली.....नंतर मात्र टेकले टी.व्ही समोर..’माय नेम इज ऍंथनी गोन्सालवीस’ पाहिला. आवडला. म्हणजे अगदीच ओल्डीज मधले मॅटीनीला दाखवले जाणारे सिनेमे पाहून हा ’कधी आला होता, हा खरंच जॅकी श्रॉफ आहे?’ असे प्रश्न पाडून घेण्यापेक्षा तो बरा होता. त्यातला ऍंथनी ज्याम इनोसन्ट वाटतो यार..... ;)

huhhh!!!! मी नॉनस्पॉट ;;) काम करु शकते( पिक्चर पाहणं तो ही एका बाजूला दुसरी कामं करता करता हे ही एक कामच असतं) याचा आनंद झाला आणि फॉर द मोमेन्ट ब्रेक तो बनता है......सो बाय!!

( मला अजून बरंच बरं वाटण्याचं कारण 'आय ऍम बॅक टू नॉर्मल' :) :D )

Monday, July 27, 2009

रोज काही नवीननवीन(त्याही चांगल्या) पोस्टस सुचत नाहीत...पण तरीही काहीतरी लिहावंसं वाटतं, रोज घडेल ते सगळंच इंटरेस्टींग नसलं तरीही.....म्हणून एक नवीन ब्लॉग सुरु केला. अर्थात त्यामागची आयडिया/ कल्पना ही इतर ब्लॉग्स पाहूनच सुचली..अमलात आणावीशी वाटली. तेव्हा सर्किट, कोहम, जास्वंदी यांना थॅक्स :)

http://sadaaphuli.blogspot.com/