आज काहीतरी नवीन करण्याचा झटका आला होता. सकाळी उठून घरात बसल्या बसल्या वेडगळ, सुखावह वाटणारे प्रकार करावेसं वाटणं.......त्यात कागद, पेन्सिल, पेन, जुने कलर्स, जुन्या पिशवीतलं क्राफ्टचं सामान....त्यातल्या चमचमत्या चांदण्या, पतंगाच्या आकाराचे लुकलुक आरसे, वेलवेट पेपर, बटर पेपर,हॅन्डमेड पेपर, काहीशा चुण्या पडलेला तरीही घडीत दुमडून ठेवलेला, ठिकठिकाणी सेलोटेप लागलेला डिझाईन पेपर, टिश्यू पेपर असा बराच मोठा खजिना हाताला लागला....पण ते करुनही स्टॅमिना न संपल्याकारणाने पीसीला हाताशी घेउन आता उद्योग करुयात असा विचार येताचक्षणी......पेंट, फोटोशॉप मध्ये जाउन लूडबूड केली. सरतेशेवटी ब्लॉगकडे आले. टेम्प्लेट चेंज करण्याचा विचार डोकावण्याचा अवकाश फाईनल्सेन्स वर जाउन दोन तीन टेम्प्लेट टकवली. पहिलं लावलं......ते फार साधं वाटलं...दुसरं एडिट केलं त्याचा कलर डार्क वाटला अशी बर्‍याचदा नाकं मुरडून कॉफीचं हे एक आवडलं. कोणत्या क्षणी मला काय आवडेल याचा भरवसा मला स्वत:ला देता येत नाही, दुस‍र्यांनी देण्याचा प्रयत्न तापदायक ठरतो.

माझे मूड स्विंग्झ टिल डेट फक्त मलाच सांभाळता आलेत. त्यामुळे मला आपला ब्लॉगोबा आवडतो. त्याला माझा लहरीपणा, अचानक कळस साधू पाहणारी क्रिएटिव्हिटी, अफाट आणि अचाट ऑपरेशन्स.....सगळं मानवतं. विनातक्रार मला आपलं म्हणण्याची त्याची तयारी असते. उगीच माझ्या बदलण्याची कारणं द्यावी लागत नाहीत.
एका महिन्यापूर्वी ओ.बी च्या लेक्चरला नेहमीच्या प्रोफेसर आल्या नव्हत्या. त्याऐवजी एक गेस्ट लेक्चर ठेवलं होतं. इंडस्ट्री मध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग देणारा माणूस होता. नाव लक्षात नाही किंवा ते मुद्दाम मी विसरले असं म्हणता येईल. त्याचं कारण असं, "त्याने त्या तेवढया थोड्या वेळासाठी सायको थेरपी का तत्सम विचित्र थेरपी अप्लाय करायला सांगितली होती. डोळे बंद करुन त्याने एकेक प्रसंग इमॅजिन करायला सांगितले ते असे..............
"चिवचिवणारी एक सुंदर सकाळ,.......तुझ्या बागेत धावणारी असंख्य फुलपाखरं.....क्षितिजावर उठलेली गुलाबी झाक.....घर तुझं....आजूबाजूची माणसं तुझी......अशा प्रसन्न सकाळी एका दिवसाची सुरुवात होतेय. सगळ्या कामात स्वत:ला झोकून देणारे आपण............." पण मला पुढचं काही दिसूच शकलं नाही. एक अर्ध्या तासाने डोळे उघडले तेव्हा शेजारीच बसलेली निक, मागे-पुढे बसलेल्या सगळ्याच चेह‍र्यावर कमालीचं समाधान, जगातली सगळी सुखं आपल्या पायाशी लोळतायत असा एक खोटा अनुभव मिळाल्याचा आनंद.....
या सगळ्यात माझ्या भावना कुठेतरी फार अलिप्त झाल्या. त्यांच्या कोणत्याही विश्वात न मावणा-या. त्या क्षणी प्रचंड एकाकी वाटलं, क्षणैक त्या माणसाचा रागही आला. मैत्रिणींसोबत चालणंही तो काही काळ नकोसं झालं.
त्याच्या थेरपीचा माझ्यावर परिणाम शून्य तो या अर्थाने की त्याने कल्पना करायला लावलेलं विश्व माझ्या आत अंतर्मुख होउन राहिलेल्या विश्वाशी एका मर्यादेनंतर साद घालूच शकलं नाही. तिथे मी माझी होते पण मला दिसणा-या गोष्टी त्याने सांगितलेल्या नव्हत्या. माझं मौन नंतरच्या उत्साही वातावरणावर साचून राहिल्यासारखं....तवंग होउन.

सगळ्या गोष्टी भर्रकन डोळ्यापुढून गेल्या. माझं मन मलाच किती उशिरा कळलं....थोडं लवकर कळलं असतं तर आज मला हवं ते करण्याची संधी मी गमावली नसती. अशी प्रचंड निराशा येते एकाएकी....टाटा चा भरलेला फॉर्म आठवतो. पिवळ्या रंगाची साईट त्यावर ब्राउन रंगाने हायलाईट होणारी’सोशल सायन्सेस’ अशी लिंक आठवते. सगळं हरवल्यासारखं होउन जातं. वेळ गेल्यानंतर अज्ञानातून कुणीतरी खेचून बाहेर काढल्यावर दरवेळी छानच वाटेल असं नाही.

लिहिल्यावर मोकळं वाटतं की मोकळं होण्याकरता लिहिलं जात असावं....पण बराच काळ एक घट्ट बसलेला वेढा सैलावतो हे खरं....... पोस्टच्या सुरुवातीला लिहिताना माझ्या ब्लॉगोबाला कपडे घातल्याच्या आनंदात होते........त्यात हळूहळू वेगळे रंग कसे मिसळत गेले हे मलाच कळलं नाही, पण या पोस्टवर एकही एडिट न मारता मी पब्लिश करणार आहे...चु.भू.द्या.घ्या.

Comments

Dk said…
Hey sakhee, loved the new name & template too.
Till today you haven’t told me which insti. you are from? TISS / Wel.? btw who was that prof. was that Mrs. Hawaldar???

nwz good post!
Anonymous said…
Amiable dispatch and this enter helped me alot in my college assignement. Thank you for your information.

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट