एक मुक्तछंद

खूप दिवसांनी लिहायला बसलं की छानपैकी पूर्वीसारखी पेन्सिलीला टोक काढून, शार्पनरमधून बाहेर पडणा-या झिरमिळ्या( दुसरा कोणता शब्द त्याला आत्ता सुचत नाहीये) कंपास बॉक्स मध्ये जपून ठेवत, मग त्याचे शुभ्र कागदावर फुलांसारखे आकार चिकटवून...त्यांच्याकडे समाधान होईस्तोवर पाहून झालं की परत डायरीकडे मोर्चा. मान वाकवून नि मन लावून आउपेक्षा वळणदार अक्षर काढण्याचा एक अविरत प्रयत्न! पण हल्ली लिहायचं म्हटलं की मला धास्ती वाटते ती समोरच्या कागदावर कुठल्या मुक्तछंदात अक्षरं उमटतील याची. मराठीत लिहिण्याची सवय सुटल्यानंतर जे काही पिळ सुटलेल्या रबरासारखं लेचंपेचं अक्षर दिसतं ते पाहून परत हातात पाटी घेउन आपल्याला गिरवण्याची नितांत गरज आहे हे जाणवत रहातं. मग ती घनघोर निराशा पदरी पाडून घेण्यापेक्षा ब्लॉगवर लिहिणं किती सुखावह...एकाच टाकाची अक्षरं, मात्रा, काने. कुणी जाणूनबुजून खोट दाखवण्याचं कारणच नाही.


दोन आठवडयांपूर्वी पुण्याला गेले होते दोन ईंटर्व्यूंसाठी. एरवी पुण्यात पाउल टाकलं म्हणजे सगळी अंगावर साचलेली धुळीची पुटं झटकून मन ताजतवानं होतं. इथल्या वेगवेगळ्या संस्कृतींचं लेणं मिरवून मिरवून कुठल्याही एका धड संस्कृतीचा भाग न उरलेल्या मनावर एक हळुवार मराठमोळी सांस्कृतिक फुंकर घातल्यासारखं होतं. मुंबई म्हणजे गुरु.. धडपडून पुन्हा ताकदीने उभं करण्याची एक जिद्द. तसं पुणं म्हणजे तापलेल्या दुधावरची साय. दोन्ही शहरं माझ्या मनातली आपापली विश्वं व्यापून एक वेगळाच भाव बाहेरच्या जगात मिरवतात, एकाचाही अंगभूत नसलेला एक भाव !


तर ज्या ठिकाणी ईंटर्व्यूसाठी गेले होते तिथला कॅम्पस अतिशय सुंदर...इन्फ्रास्ट्रक्चर मोहात पाडणारं, रस्त्यांची वळणं म्हणजे ’ ल गा गा’ च्या बांधणीत( प्रवासात नेहमी माझ्यावर भाईंचा प्रभाव असतो...का ते ठाउक नाही पण भाई आणि माझा प्रवास एकत्रच फिरतात. त्यामुळे प्रवासात मला टाईमपास म्हणून बहुतेक यावेळी गटण्याने खो दिला होता)...साहजिकच प्रवासाचा शीण तिथल्या वातावरणात आपोआप कमी झाला. टेस्ट देउन नंतर ईंटर्व्यू होता. ईंटर्व्यू नावाची गोष्ट ही फक्त घेणंच आनंददायी असू शकतं, देणं म्हणजे आपल्या अज्ञानाची शिवण उसवलीच तर....त्यावर धावता दोरा घालण्याइतपतही उसंत मिळत‌‌‌ नसते. तिथे पॅनलवर आपलेच म‍र्हाटी वयस्कर गृहस्थ होते. त्यांनी, मी रहायला मुंबई म्हटल्यावर विचारलं..’how was the journey till here?'

’भुजंगप्रयातासारखी वळणं होती, काळाकभिन्न अंधार असलेले बोगदे होते’.....तत्सम मातृभाषेत कोलांटया माराव्याशा वाटल्या; पण म्हटलं नको, चुकून माझ्यातल्या ’गटणेने’ पार्टी बदलली आणि त्याला समोरच्या खुर्चीवर बसून छंदींचे फटके ऐकवावेसे वाटले तर बोंब. म्हणून साधं आणि सोप्पं ’छान झाला’ असं म्हणून गप्प बसले. पण मनासारखा ईंटर्व्यू झाल्याचं एक समाधान.....तिकडे काही admission घ्यायचं नव्हतं पण हे बिनीचे छोटे प्रवास. यावर पुढच्या प्रवासाचा आराखडा तयार होतो....आपण केवढया पाण्यात आहोत की अजून फक्त पावलंच भिजलीयेत हे तरी कळतं.

ब्लॉगवर लिहिताना वाटतं...खरं तर सुचेल तसं मांडताना वाटतं...मी यापूर्वीच्या काही आठवणी का लिहून ठेवल्या नाहीत? फार मोठा नाही पण एक चिमुकला प्रवास आपलाही झालाय की, कदाचित एक संवाद झाला असता ’स्व’शीच.




Comments

Rashmi Jain said…
Welcome back and hope you enjoyed the new experience......
Keep writing....
Dk said…
hmmm khar aahe sarvapratahm blog var maayboli var jevha mi marathee lihaaylaa suruvaat kelee na tenvha mala phaar ch bare vaatle kaarn maaze akshr!! :( ekdam sahii vaatt as sundar lihitaanaa. Aaai ch akshar phaar ch chaan aahe aani as compared to that maze maatra -10 aahe.


Nwaz good post. kaay mag kase zaala interview?? kuthe ghetli admission?
Raj said…
मस्त :)
ब्लॉग टेंप्लेटही झकास!

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट