पत्र लिहिण्यास कारण की......

"तुझ्या कानात कूsssss कलू?????"

एक वेलचीचा टाका वर घेउन मी वर बघण्याच्या आत, कानाजवळ एक गुदगुली झाली....पण त्या सरप्राईजच्या खटाटोपात बोटातून ती हिरवी गुंडाळी खाली पडली...क्षणार्धात ती उचलून परत फुलपाखरासारखी बोटं गुंफून कानाजवळ........यावेळी मात्र जोरात शीळ या टोकातून त्या टोकाकडे गेली.
चिमुकल्या आनंदात गालावर एक लब्बाड हसू उमटलं होतं.

"कान दुखला ना माझा...बघू काय आहे ते?"

काय असेल?? यू वोन्ट बिलिव्ह अर्चन,.........’पिंपळाचं पान’,...त्याचं बारीक वेटोळं करुन फुंकर घालून शीळ घालण्याचे उद्योग चालले होते.

"कुणी शिकवलं हे?? काय काय करत असतेस ठमे तू...."
त्यावर ओठांचा नाजूक चंबू झाला...
"वासूसू..sssss ने."

माझ्या भुवया नकळत वर गेल्या.
"आजोबा.....आजोबा म्हणायचं त्यांना, वासू नाही...काय?"

बाजूच्याच खांबावर गिरक्या घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला...लक्ष नाहीये आपलं असं सुचवत. मग मीही माझा हेका सुरु ठेवला. गिरकीसरशी तिचा एक हात बाहेर झेपावला तोच पकडून तिला पुढे आणलं...आणि दोन्ही हात एकात बांधून विचारलं...

"काय म्हणायचं मनू....?"
बारीकशा पापण्या वर उचलून ओठांचं परत एक बुचाचं फूल झालं आणि.....
"वासूsssssssssssss" म्हणून हात अलगद सोडवून घेत परत बाहेर पसार.

भांबरी, वासू.....सगळ्यांना अरे-तुरे करुन मोकळी. त्या म्हाता-यांनाही ते आवडतं त्यामुळे माझं काही चालण्याचा प्रश्नच नाही.
तिच्या हातातलं पिंपळाचं पान बघून कल्पना आली, हिचे परवा बागेत काय उद्योग चालले असतील. आरामात भांबरीच्या कडेवर बसून वर येत असताना....भांबरीच्या स्वत:शीच चाललेल्या अखंड बडबडीचा अर्थ आत्ता कुठे स्पष्ट झाला. तिला माझ्या हातात सोपवून भांबरी सुरकुतल्या पण तेजस्वी डोळ्यांनी म्हणाली......

" रेवा,ह्या पोराला उन न्हाई, वारा न्हाई की पाउस न्हाई....कशाचं बी भ्या न्हाई.......सगळ्या जगाशी डाव मांडून बसते. आत्ता भर उन्हाच्या वक्ताला, माळ्यालगतच्या.....अंगणात बूड शेकत बसलं होतं ह्ये पोर,आन त्ये बी पिंपळाच्या झाडापाशी. म्या म्हनलं भुतं असत्यात रातीला झाडाकडे.....तर बकुळीवानी हसली. घ्या..........काय म्हनायचं ह्या पोराला, देवा काय पाठवलंयस ह्ये....हां" असं म्हणून परत स्व:तच्याच बोलण्यात, कधी परत मानूशी खेळण्यात दंग होउन गेली.

माझ्या मनात परत देव, बकुळ, पिंपळ सगळे संदर्भ ओळीने जागे होत गेले.

हल्ली आम्ही संध्याकाळी गोरव्याच्या समुद्रावर जातो....मनूची चिमुकली पावलं भिजल्या वाळूत उमटत जातात आणि ’ते बघ अर्चन’.......असं म्हणत माझा हात एकटाच हलतो.
सगळा समुद्र ही अंगावर घेउन हिंडते....वाळू अगदी डोक्यापासून पायापर्यंत...तिच्या थ्री फोर्थच्या वरच्या घडीत अडकून बसते.....डाळिंबी वर्ख लावल्यासारखी.
वाळूत आमच्या रेघोट्या मारुन झाल्या की कावळा उडाला, चिमणी उडाली............. करत बोटातून वाळू सरकते, माझं लक्ष समोर उडत जाणा-या काळ्या रांगेकडे जातं....आपोआप त्यांच्या उडण्याच्या लयीसोबत बोट वर खाली होउ लागतं.

"माई......बल्फं..............."
"नो...........नो बर्फ. घसा कोणाचा सुजतो, खोकतं कोण. ते काही नाही नो बर्फ बास्स."
"एकदाच, फक्त एकदाच हवाय नं पण....दे ना बल्फं."

तिचा ’ल’आणि माझा ’र’ भांडत भांडत मोठे होतात सरतेशेवटी ’ल’ जिंकतो आणि ओठांवरुन लाल, हिरवं पाणी ऐटीत स्स्सल्प.....करत वाहायला लागतं. तिच्या डोक्यावरच्या काळ्याभोर समुद्रातून माझी बोटं नकळत फिरत रहातात. तिच्या सरबतात तिचा ऑलेंज,ग्लीन बर्फ वितळत रहातो. समोर खाली खाली घसरत चाललेल्या आभाळातला सूर्यही वितळतो. माझ्या मनातला तसाच वितळत जाणारा क्षण म धरुन ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो...तो वितळतोच...

घरी निघताना मुक्या चांदण्यांखाली चालता चालता ती एकदम थांबते.
"माई...............हे बघ क्काय...दम्मत."
तिच्या पुढे केलेल्या हातात....एक छोटा शंख असतो. ओल्या वाळूतला, शुभ्र संगमरवरी रंगाचा.....................

Comments

Unknown said…
खूपच छान लिहिलेस.....आता बाकिच्याही पोस्ट वाचणार आहे.....ब्लॉगचे रुपही मस्त आहे....
तन्वी
Asha Joglekar said…
लेख अगदी छान आहे. लेक डोळ्या समोर उभी राहिली तुमची . ब्लॉग चं रूप ही सुरेख आहे .
लेख आवडला, छान लिहीले आहे :-)
सखी said…
सगळ्यांनाच धन्यवाद :)

@ तन्वी,तुझा ब्लॉग ओपन होत नाहीये, वाचणार कसा? :(

@ आशाताई मनू ही ’मानसकन्या’ आहे. :)
Dk said…
hehehehe too good :D :D
Anonymous said…
Sahich Lihilays,tujhya manula pratyaksh pahat aslyasarkha vatal,tichya pudhchya khodya n gamtihi vachayla aavdtil,so pls do write abt her soon....
khuup Chaan jamalay he post.
sushant said…
you are an amazing writer
if this is your manaskanya then hats off to you
coz mad eme vividly picture a bubly girl with black locks on her forehead and mischevious eyes :) this is too good keep posting
सखी said…
deep,bhanasa,yashodhara & sushant khup khup dhanyavad!! :)

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट