विसावा

"आई, आपल्याला गाव का नाहीये?"
"अगं गाव नाहीये असं नाही, पण आता तिथे कुणी रहात नाही."
"पण का राहात नाहीत, सगळे सुट्टीत गावाला जातात , माझ्या सगळ्या मैत्रिणी जातात....आपणच जात नाही."
"तुझं घर आपण कोकणातच घेउ, मग तर झालं?"
"पण आत्ताची मजा तेव्हा येईल का?"
"बरं एक काम करु...आपण या सुट्टीत खानवलीला जाउन येउ...मामाला सांगूयात तसं."
"तुला गाव आहे?"
"हो......आम्ही भरपूर धमाल केलीय अगं लहानपणी. मी आणि दादा मामा.....काय काय नाही केलंय ते विचार. तुला आणि विभूला नेउन आणू."
"पण मग तू एवढे वर्ष का गेली नाहीस परत?"
"अगं लग्नानंतर जाणं झालंच नाही, पण आता जाउ...."
"हं...."
"बघ हो, पण गावाला पाणी नसतं हल्ली....लाईट्स जातात ब‍र्याचदा."
"बघू ते आपण नंतर......आधी मला जायचंय तिथे."

पाच वर्षांपूर्वी आयुष्यात पहिल्यांदा गावाला जाउन आले...ती गावाची पहिली आणि आतापर्यंत शेवटची ओळख. आठवणी मात्र अजूनही ताज्या.......

’कारने जाताना दुरून दिसणारी रोपं, मधूनच दिसणारा पिवळ्या फुलांचा गच्च ताटवा, आणि नंतर कुठेतरी विरळ होत जणारं कोरडं रान.......प्रवेशाच्या वाटेवर गावदेवीचं देउळ. तिथून खाली वळणं घेत गेलेला रस्ता.....सरळ घरापाशी येउन थांबलेला....त्याला जसे काही सगळे मागोवे ठाउक. पायांना लाल मातीचा स्पर्श.....पहिल्या प्रथम अनुभवलेलं नातं....घुंगरांच्या आवाजात अस्पष्ट होत गेलेली मातीची लय. चालता चालता मागे वळून पहावं तर रस्त्याचा उगम अस्पष्ट होत गेलेला.....गावरान भूल घातल्यासारखा,पण पोफळीच्या बागांमध्ये रस्त्याचं अनोखेपण हळूहळू आपलंसं होत गेलं......
पडवीत शिरल्या शिरल्या रातांब्यांचा येणारा आंबटसर वास.....अंगणाबाहेर पणजोबांची मूर्ती, एकटक लावून पहावं तर त्यांचे डोळे बरंच काही बोलून गेले.

दुपारचं साधंच जेवण...गुरगुटया भात आणि वर लसूण-नारळाची चटणी...पण अवीट गोडी.
"खा गो.....आवडलं नाही का, तिखट झालंय का?"....आईच्या काकूचा काळजीयुक्त प्रश्न. गावची माणसं खरंच साधी असतात, त्यांचं आदरातिथ्य आणि प्रेम सगळ्याचा ओलावा जेवणात उतरलेला असतो.
तिथे चुलीजवळ बसून तिच्या हातात सरसर वळणा-या भाक-या आणि त्यांना चुलीची खमंग चव नुसत्या डोळ्यांनी पाहून घेतल्यावर ती खाण्याचं अप्रूप ते केवढं....घरी दोन पेक्षा वर पोळ्या गेल्या नसतील पण तव्याएवढ्या आकाराच्या तीन भाक‍र्या पोटात सहज गुडुप्प.

गावच्या नदीवर दुपारी आंघोळ करुन आलेले बाबा, मामा...विभू....चित्रच सर्वतोपरी वेगळं. दोन दिवसाच्या वेगळेपणात ते ही मनात कोरलं गेलं. पडवीत बसून आंबे चोखून खाण्यातली मजा वेगळी....तिथे आंब्याच्या झाडाला येणारी फुलं, पाणी शिंपलेल्या मातीची ओल, गोठा.....
रात्री पडवीतल्याच उंच ओसरीवर बसून गप्पा....निळसर, लख्ख पायाशी रेंगाळणारं चांदणं, रातकिड्यांचे आवाज....पूर्ण रात्रभर झोप लागली नाही आणि पहाटे पहाटे डोळे मिटले.

दुस‍र्या दिवशी करवंदीच्या जाळ्यांमध्ये घुसून फडशा पाडला. मग तिथल्याच माळावर गाडीला टेकून उभं असताना मामाला चेष्टेची लहर आली....
सकाळी आंघोळीला जाताना बाथ्रूम बघून चेह‍र्यावरचे भाव त्याने पाहिले होते. मग उगीच कोपरखळ्या मारत...आवडलं का गाव, इथलाच बघूया का तुला? असे तत्सम मामा टाईप प्रश्न त्याने विचारले. त्याला तशीच भाची टाईप उत्तरं दिली. ;)
तिस‍र्या दिवशी निघताना काहीच वाटलं नाही पण घरी आल्यावर गावं अख्खंच्या अख्खं डोळ्यापुढे....
एकदाच पाहिलेल्या गावाची गोष्ट....तशीच मनातल्या मनात झोके घेत राहते.

Comments

Jaswandi said…
mastch lihilays ga! Kokan asach kayam manat rahata!
aga kaay laavalay sagalayanee! kokanaabaddal lihitaay! malaa aattaachyaa aattaa maajhyaa aajoLee jayacha!

naahe milenaare jaayalaa pan...
:((( bhyaa...:(

khuup chaan lihila aahe ga..
Unknown said…
yasho shi sahamat ! maz gav koknat nahiye.. rather ata gav ch nahiye mhantala tari chalel! pan asa saglyanni jalwaycha nahi yaar ! :)

mast lihlays ! :)
सखी said…
जास्वंदी,यशो,भाग्यश्री थॅंक्स!
यशोधरा,तुझ्यासारखंच मलाही भ्यॅंssss करावंसं वाटतंय :(.
Dk said…
सखी,

भ्यॅंssss मला पण जायचय गावाला... पण गाव नाही.... :-(


छानच लिहिलयस तू हे सारे आता मला ज्याम म्हणजे ज्यामच बोर होतय

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट