ही वाट दूर जाते


पाठोपाठ दोन सलग आठवडयांनी कंटाळ्याला ऊत आणला की मी समोरच्या रस्त्याचं टोक पकडून सुसाट चालत सुटते. घराच्या खिडकीतून डोकावून पाहिल्यावर रेंगाळलेला रस्ता दिसतो.....रस्त्यावर उभं राहिलं की डाव्या हाताला लागूनच एक मोठ्ठंच्या मोठ्ठं खाजण पसरलंय....वेडया -वाकडया, खुरटया कशाही वाढलेल्या खारफुटी आणि पलीकडे उंच बिल्डिंग्झची एक आडवी रांग....

मागे मान वळवून पहावी तर कंपाउंड वॉलच्या आत गच्च गर्दीत, सुपारीच्या झावळ्यांची मिट्ट दाटीवाटी आणि त्यात हरवून गेलेली खिडकी...... त्यातल्या त्यात लक्षात राहतात त्या पोफळीच्या झाडांवरच्या पांढुरक्या रेषा, मध्यावर ठळक आणि पायथ्याशी पुसट होत गेलेल्या....वरच्या अंगाला त्यातूनच फुलून आलाय की काय असं वाटायला लावणारा हिरवाकंच पोफळीचा गाभा.....त्यातून बारीकसे तुरे आणि छोटी फळं दिसायला लागलीयेत......

पुढे पुढे जाताना मिचकुडया निऑन लाईट्सचा प्रकाश आळशासारखा वरच्या वरच झाडांवर पसरुन तेवढाच भाग सोनेरी होउन लखलखतो.....उतरतीला वाकून रस्त्याकडे झेपावणा-य़ा त्यांच्या फांद्या....आता पाउस सरसरेल तशा तरारुन वर येतील....

याच रस्त्याचं बोट धरुन पुढे चालावं तर तोंडापाशी येताच तो गजबत्या रहदारीत, कल्लोळातल्या वर्दळीत सावकाश ढकलून देतो...मागे एकुलती एक शांतताही लुप्त होते. नव्या आलेल्या पाहुण्याला गल्लीबोळांची गणितं घालून बुचकळ्यात पाडणारा हा एरिया आणि त्यातले ठराविक रस्ते सकाळी आणि संध्याकाळी फक्त अनुभवण्यासारखे असतात.....

सगळ्या रहदारीला टाळून मधल्याच गल्लीत मी शिरते,...........एक जाणतं आपलेपण मनात पाउल टाकतं.
गुलमोहरापेक्षा उंच होत गेलेली बोगनवेल.....तिच्या वरच्या फांदीवर राणी, पांढ‍र्या दोन्ही रंगाच्या फुलांचा बहर त्यातून वरचं फिक्कट निळसर आकाश पुंजक्या-पुंजक्यातून ठिबकत रहातं. पावलांसारखीच विचारांनाही गती आलेली असते आणि अशावेळी कुणी भेटून त्याला अनपेक्षित ब्रेक लागू नये असं मनोमन वाटत रहातं......आणि कुणी भेटतही नाही.

परिचयाचं घट्ट वेटोळं घालून बसलेल्या परिसरात पन्नास पावलं चालूनही कुणी खरोखर भेटत नाही तेव्हा दुस‍र्याच क्षणी चुकचुकल्यासारखं होतं.............वेडसर संधिप्रकाशातल्या संथा अलगद वर येतात. त्यांना न चुकता लक्षात ठेवण्याचा प्रयत्न सुरु होतो. काही वेळापर्यंत तो लक्षात राहतो एवढयात कुठल्यातरी घंटेने तंद्री तुटते.....’अरे इथे राईट टर्न घ्यायला हवा होता.’

पण पावलांची वळलेली दिशा परतवण्याचा प्रयत्न करावासा वाटत नाही......उजव्या हाताला लागून , लाईट पिंक रंगातून बाहेर काढलेल्या, एकसारख्या दिसणा-या कर्मचारी निवासाच्या चारमजली इमारतींची रांग सुरु होते. त्यांची साचेबद्धता क्षणैक अंगावर येते. हाताशेजारी असलेलं धोत‍र्याच्या फुलांचं कुंपण केव्हाच नाहीसं झालेलं असतं तरी तिथे परत सवयीची नजर वळते.....उत्साहात पाय आत टाकण्याच्या प्रयत्नात ग्रील दबकून करकरतं आणि आपल्याच राज्याचं परक्यासारखं निरीक्षण करणा-या पोरक्या राजासारखी अवस्था होते.....

पुढे दोन तीन पावलं आत शिरुन वळण्याच्या ओघात असताना ’पण गेटवर नेमप्लेट वाचलीच नाही’ म्हणून मागे फिरुन पहावं का? फारसा आशादायक कौल न देता पुढे यावंसं वाटतं.

"ए, तुला आमच्या सोसायटीचं नाव माहितीये का? राजांच्या गडाचं नाव आहे त्याला."
"राजांच्या गडाचं?"
"हो, मग, तू पाहिलं नाहीस का येता येता?"
"नाही....."
"हात्तिच्या मारी.....चल दाखवते ना...नंतर खेळूया."
लहान चुलत बहिणीचा हात अक्षरश: ओढून तिला दरवाज्यापर्यंत आणलं जातं आणि अभिमानाने नाक फुगवून पाटी वाचण्याची आज्ञा होते.
"हा राजांनी जिंकलेला पहिला गड, फक्त आमच्याच सोसायटीचं हे नाव आहे ओक्के?"
"मग बाकीच्या सोसायटयांना?"
"त्यांना एकदम पेद्रट नावं आहेत,..............ते जाउ दे, चल जाउया खेळायला."


उगीचच एक दडपण येतं आणि ’आल्या पावली परत फिरुया का?’

................................................................

ट्रिंग ट्रिंगssss

दचकून भानावर येताना, सायकलच्या दोन्ही बाजूंना झोळासारख्या प्लास्टीक बॅगा लावून, एका बाजूने शरीराचा हेल काढून पॅडल मारत जाणारा पाववाला माझ्या हलण्याची वाट बघत गेटपाशीच रेंगाळलेला दिसतो.....भानावर येण्याची माझी लक्षणं दिसत नाहीत बघितल्यावर त्याची व्यावसायिक बेल वाजते. आत जाता जाता एकमेकांवर तोल सांभाळत उभी केलेली अंडी, बेकरीतून नुकत्याच आणलेल्या पावांचा यीस्टाळ वास घमघमत बाजूने जातो.
घडयाळ चाचपल्यावर ओळखीची वेळ पाहून काटे सरकल्यासारखे वाटतात.

मंदावत जाणा-या प्रकाशाची तिरीप पसरट कोन साधून पत्र्यांवरुन खाली येते, उरलेल्या कवडशांसरशी घरांपुढच्या अंगणात मावळतीची किणकिण होते.....घर दिसतं. मनात चाललेली आंदोलनं हळूहळू संथ होत गेल्यासारखी अस्पष्ट ऐकू येतात......

शेजारच्या तेलुगु काकींच्या घराच्या पायरीवर बसल्यावर संपूर्ण न्याहाळता येतं.....ती अगदी आवडती जागा.
समोरुन कुणी जुनं-पानं चालत येताना दिसतं, ’अरे आज इकडे कुठे गं?.....किती मोठी झालीयेस, उंचही वाटत्येस की..’ एवढा वेळ कुणी भेटू नये चा आग्रह गळून पडतो, आनंदत विचारपूस होते. शेजार्‍यांकडे आले होते असं काहीसं कारण पुढे करुन तिथल्या पायरीवर बसण्याचा मोह काही आवरत नाही.

नळातून खाली भरलेल्या बादलीत पाणी पडण्या-या टुबुक-टुबुक आवाजापाठोपाठ शांततेचे बुरुज ढासळतात..........

’घरातल्या दोन सर्वात आवडत्या जागा म्हणजे ’घर नवीन बांधताना करुन घेतलेला माळा आणि मागच्या घराची भिंत आणि अलीकडची भिंत यामधोमध तयार झालेली चिंचोळी जागा....पावसाचं पाणी टपटपलं की तिकडची भिंत ओली होउन इतका सुंदर, हवाहवासा वास येतो. माळा म्हणजे काही गोष्टी सुरक्षित ठेवण्याची, छोटया कारणांवरुन मुसमुसण्याची हमखास जागा. त्याची नी आपली ’आळीमिळी गुपचिळी’.

एक टेबलफॅन आणि हातात पुस्तक एवढं आटोपशीर सामान घेउन दुपारी, रात्री सडाफटिंग पिकनिक ठरलेल्या. उन्हाळ्यात दुपारी दुपारी पत्रे फुलून येत....घामाच्या धारा लागल्या तरी माळा हीच जागा लाडकी.
ऐन उन्हाळ्यात पाण्याचे सपसप हबके अंगणात मारले की बाहेर थंडावा येवो न येवो त्या जोरानिशी मनात थंड हवेच्या झुळुका आपसूक वाहायच्या.


दिवाळीची पहिली-वहिली ठिपके सोडून इतरत्र भरकटलेली रांगोळीही याच अंगणात..........गेरुने, रंगांनी रंगलेले हात....ड्रेसवर, चुकून आईच्या साडीवर सगळीकडे नक्षी...उमटवत...
फरश्या घालण्याआधी हौसेने लावलेलं अनंत, चिनी गुलाब आणि जास्वंदाचं झाड. ते मोठं होउन त्याला जास्वंद येईपर्य़ंत वाट धरवत्ये कुणाला. मग डाव्या हाताला घर असलेल्या म्हातारीच्या झाडावरची गुपचूप आणायची.......पण तिने पाहिलं, किंवा कळलं तर तिची किणकिण सुरु. ती तणतणली की तिच्या रुंद कपाळावरचं निळं बेळगावी बाजाचं गोंदण आठीभर पसरे.


उजव्या बाजूला राह‍णा‍र्या काकी तेलुगु...........त्यांचं लोणचं आणि चिंचेचं सार याची चव कुणाच्याही हाताला नाही.

सोसायटीतल्या घराचा एक गुण, मदतीला हाकेच्या अंतरावर दहा माणसं आपणहून तयार.......इथल्या बंद फ्लॅट- सिस्टीमध्ये कुणी वरची वारी केली तरी दोन दिवस लक्षात येणार नाही.
लाईटस गेले की बाहेर खुर्च्या टाकून मोकळं आकाश अंगावर घेण्याचं सुख याच घराला......ते फ्रेंच विंडो मधून काही केल्या येत नाही.
सगळे सणवार आणि त्यांचा अमाप ओसंडून वाहणारा उत्साह चेह‍र्यावर पाहून घ्यावा. आताच्या राहत्या घरात दोन विंग सोडून राहणा-या एकाच मुलीशी ओळख.....
इथल्या नव्या घराच्या सुरुवातीला आवडलेल्या ऑईलपेंटच्या वासात जुन्याची ओळख हरवून गेली....कमावलेल्या नवीन सुखसोयींमध्ये हरवलेल्या गमती-जमती, खाणाखुणा आठवतात तेव्हा दाटून येतं.’

पाठीवरुन घामाच्या वाहणा-या ओघळांच्या हालचाली एव्हाना जाणवल्या.....समोर सोसायटीतल्या दिव्यांच्या खुरटया प्रकाशात सगळं अंधुक दिसायला लागलं. पाय काढता घेतला आणि मागे वळून न पाहता थेट गेटच्या बाहेर पडले........इतके दिवस ये-जा असते, पण एखाद्या ठिकाणाहून, एखाद दिवशीच निघताना काहीतरी तुटल्यासारखं होतं

आपलं न राहिलेल्या घराच्या पायरीवरुन उठण्याची कल्पना त्रासदायक असते.

Comments

bhaanasa said…
जुनं गाव सोडताना, आता आपलं नसलेल्या माझ्या घराच्या पायरीवर मूक रुदन करीत बसून होते. पावलांना मणाचे दगड बांधल्यागत...
सुंदर पोस्ट.

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट