बाल्कनी : १
’बाल्कनी’ म्हणजे बाल्कनी ! बैठ्या सोसायटयांमधल्या घरकर्यांचा जीव की प्राण, म्हणजे जीव गेला तरी प्राण बाल्कनीत शिल्लक असं काहीसं बाल्कनी उर्फ गॅलरीचं पूर्वीचं ग्लॅमर. त्यातली मानाच्या गणपतीसारखी ’मानाची गॅलरी’ म्हणजे ’डी’च्या रुमची गॅलरी. ऐसपैस, मोकळीढाकळी सेम सोसायटीतल्या बायकांसारखी. तशी सोसायटीतल्या प्रत्येक घराला बाल्कनी, पण ती पुढे-मागे असण्यातली गोम फक्त सोसायटीकरांनाच ठाउक. हाउसफुल्ल शो चं तिकीट काढताना नाटक आणि सिनेमा यातली गल्लत बराच काळ चुटपुट लावू शकते तशीच जागा घेताना बाल्कनी पुढे-मागे असण्याचं महत्त्व लक्षात घेतलं नाही तर आयुष्यभराची खंत गॅलरीत पुरून जगावं लागतं. बाल्कनीच्या घराचं प्रेस्टीज फार...म्हणजे ’विवाह नोंदणी कार्यालयाने ’मुलगा स्वतंत्र नाही पण राहत्या घराच्या बेडरुम सेपरेट’ अशी’ आकर्षक’ ऍड द्यावी तसं सोसायटीकरांनी उपवर मुलीच्या पित्याला ’आमची ’डी’ची रुम, विथ अटॅच्ड बाल्कनी/बाल्कनी अटॅच्ड’ असं सांगून उपकृत करावं. गॅलरीवर लोकांचं असं प्रेम!! एवढं की शेलाटेंसारख्या अभिमानी मध्यमवर्गीय माणसाने संपूर्ण आयुष्यच गॅलरीत ’संगणकी शिकवण्या’ घेत वेचलं. तर सांगायची गोष्ट ही की...